कारमधून अवैधपणे वाहतूक : दोघांना अटक
बेंगळूर
आंध्रप्रदेशमधून बेंगळूरला बेकायदेशीरपणे आणण्यात येणारे 800 किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. वनखात्याच्या कर्मचाऱयांनी सिनेस्टाईलने रक्तचंदनाची लाकडे वाहतूक होणारी कार अडविली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहेत. मुद्दरेड्डी नायक आणि बाशा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुद्दरेड्डी हा आंध्रप्रदेशच्या अनंतपूरम जिल्हय़ातील तर बाशा हा होसकोटे तालुक्यातील रहिवासी आहे.
बागेपल्लीकडून बेंगळूरच्या दिशेने कारमधून रक्तचंदनाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती चिक्कबळ्ळापूर उपवन विभागाला मिळाली. यावेळी रस्त्यावर आडवे लावलेल्या वाहनांना ठोकरून आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार रस्त्याशेजारील खड्डय़ात कोसळली. त्यामुळे आरोपी वनअधिकाऱयांच्या तावडीत सापडले. दोन्ही आरोपी गंभीर जखमी झाले आहेत.