बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. काही राज्यात कमी तर काही राज्यात जास्त रुग्ण संख्या पहायला मिळत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यत रुग्णसंख्येत भरमसाट वाढ झालेली पहायला मिळत आहे. यामध्ये कर्नाटकातील बंगळूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.रने सक्रिय रुग्ण संख्येत मुंबईला मागे टाकले आहे. जूनच्या अखेरीस शहरातील कोरोनाची प्रकरणे इतर शहरांच्या तुलनेत कमी होती पण आता शहरी जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रविवारी मुंबईला मागे टाकून बेंगळूर हे देशातील तिसरे सर्वात जास्त कोरोना ग्रस्त शहर ठरले.
जूनच्या अखेरीस बेंगळूरमध्ये फक्त ४५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते आणि मुंबईत हे प्रमाण ८० हजाराच्या जवळपास होते. आता बेंगळूरमध्ये कोरोनाची जवळजवळ ४१ हजार सक्रिय प्रकरणे आहेत. बेंगळूर हे पुण्यानंतरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे शहर आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज तीन हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.
सोमवारी राज्यात ८,२४४ नवीन रुग्णांची भर पडली यपैकी २,९६६ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात सापडले आहेत. आता पर्यंत एकूण १,७३,६२८ रुग्ण सपडले आहेत. त्यापैकी १,३०,६२७रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर ४०,५२७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २,४७३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.