बीसीसीआय अध्यक्ष गांगुली, सचिव शाह यांच्या हस्ते कोनशिला स्थापन, तीन मैदाने असणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
नव्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या निर्माण कार्याला सोमवारी येथे बीसीसीआयने सुरुवात केली असून बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह यांच्या हस्ते या संकुलाची कोनशिला बसविण्यात आली. बीसीसीआयने ही जमीन 99 वर्षांच्या लीजवर घेतली आहे.
‘नव्या क्रिकेट अकादमीची सुरुवात आज करण्यात आली असून बेंगळूरमध्ये नव्या ठिकाणी त्याची कोनशिला स्थापन करण्यात आली,’ असे गांगुली यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगताना या समारंभाची छायाचित्रेही त्यांनी शेअर केली आहेत. ‘भविष्याचा विचार करून आम्ही नव्या जागेवर सेंटर ऑफ एक्सलन्सी निर्माण करीत असून नवे प्रतिभावान क्रिकेटपटू त्यातून निर्माण होणार आहेत. देशातील क्रिकेट इकोसिस्टिमलाही त्याचे साहय़ होणार आहे,’ असे जय शाह यांनी म्हटले आहे. कोनशिला समारंभास उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण धुमल, सहसचिव जयेश जॉर्ज, एनसीए अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते.
सध्या अस्तित्वात असलेल्या एनसीएची सुरुवात 2000 मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या आवारात करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे स्टेडियम केएससीएच्या मालकीचे असून त्यातील ग्राऊंड बी सरावासाठी बीसीसीआयला भोडतत्त्वावर दिले आहे. याशिवाय इनडोअर सरावाची सुविधा व अत्याधुनिक जिम्नॅशियमची स्वतंत्र सुविधाही त्यात करण्यात आली आहे. नवी अकादमी वर्षभरात तयार होणार असून त्यात एकूण तीन मैदाने तयार करण्यात येणार आहेत. स्थानिक सामने आयोजित करण्यासाठीही या मैदानांचा उपयोग केला जाणार आहे.