बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने बुधवारी दुग्ध उत्पादक शेतकरी, पशुपालकांपर्यंत पोचण्यासाठी आणि पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रथमच पशु कल्याण युद्ध कक्ष सुरू केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी गायीची ‘पूजा’ करून हे युद्ध कक्ष सुरू केले. यावेळी “देशाच्या जीडीपीमध्ये पशुपालकांचे मोठे योगदान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, बेंगळूर येथील पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा आयुक्त कार्यालय (सीएएचव्हीएस) येथे युद्ध कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सीएएचव्हीएस येथे ४५ लाख रुपये खर्च करून प्राणी कल्याण कक्ष आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनी सांगितले की, हे हेल्पलाइन, पशुपालन, रोग, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हानी व क्रूरतेपासून संरक्षण करण्यासाठी मदत करेल.