बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा वेग वाढत आहे. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपासून कर्नाटकच्या बाहेरून बेंगळूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नकारात्मक आरटी-पीसीआर कोरोना चाचणी अहवाल सादर करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गुरुवारी जाहीर केले.
“राज्यासह बेंगळूरमध्ये येत्या काही दिवसांत या प्रकरणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बेंगळूरमधील ६० टक्क्यांहून अधिक प्रवासी अंतर्देशीय प्रवासी असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाला १ एप्रिलपासून आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल द्यावा लागेल,” असे सुधाकर म्हणाले. कर्नाटकबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून येणाऱ्या आणि शहरातील कायमस्वरुपी रहिवाशांसह इतर नागरिकांनाही हा नियम लागू होईल, असेही ते म्हणाले. आजपर्यंत, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमधून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून असा अहवाल घेतला आहे.