अमेरिकेहून परतलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्यावर स्वतंत्र कक्षात उपचार : पत्नी, मुलगा, कारचालकही देखरेखीखाली
प्रतिनिधी/ बेंगळूर
संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा कर्नाटकात पहिला रुग्ण बेंगळूरमध्ये आढळून आला आहे. मागील आठवडय़ात बेंगळूरमधील आयटी कंपनीत काम करणाऱया हैदराबादमधील अभियंत्याला कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला होता. यापाठोपाठ बेंगळूरस्थित सॉफ्टवेअर अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळूर शहर आणि ग्रामीण जिल्हय़ांतील एलकेजी, युकेजीसह पाचवीपर्यंतच्या शाळांना सुटी घोषित करण्यात आली आहे.
आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकेहून बेंगळूरला परतलेल्या 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले आहे. 1 मार्च रोजी हा सॉफ्टवेअर अभियंता पत्नी आणि मुलासमवेत अमेरिकेच्या न्यूयॉर्कहून परतला होता. त्याची केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची आरोग्य तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली नव्हती.
अमेरिकेहून परतल्यानंतर दोन दिवस कंपनीत काम केलेल्या या कर्मचाऱयाने 5 मार्च रोजी छातीत वेदना जाणवू लागल्याने राजीव गांधी इस्पितळात तपासणी करून घेतली होती. डॉक्टरांनी दोन वेळा त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सोमवारी सकाळी तो कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर बेंगळूरच्या राजीव गांधी इस्पितळात स्वतंत्र कक्षामध्ये उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे त्याची पत्नी, मुलगा आणि कारचालकावर देखील स्वतंत्रपणे उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. सुधाकर यांनी दिली.
कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने देखील कोरोनाबाबत सोमवारी रात्री हेल्थ बुलेटीन प्रसिद्ध केली असून अमेरिकेहून बेंगळूरला आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरस आढळून आल्याचे सांगितले आहे. सदर व्यक्ती वास्तव्य करीत असलेल्या घराजवळील आणि त्याच्या कंपनीतील इतर कर्मचाऱयांचीही तपासणी करण्यात येईल, असे आरोग्य खात्याने सांगितले आहे.
मंगळूरमध्ये संशयित रुग्ण इस्पितळातून फरार
भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मंगळूर विमानतळावर दुबईहून आलेल्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला इस्पितळात अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. पण त्याने रविवारी इस्पितळातील वैद्यकीय कर्मचाऱयाशी हुज्जत घालून आपण दुसऱया इस्पितळात जाऊन उपचार घेणार असल्याचे तेथून पलायन केले. इस्पितळ प्रशासनाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मंगळूर जिल्हय़ात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.