दिल्लीच्या एनआयए अधिकाऱयांची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याची राजधानी बेंगळूरसह देशातील विविध शहरांमध्ये घातपात घडविण्याचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बसवनगुडी येथे संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल रेहमान असे त्याचे नाव आहे. रेहमान हा सिरियामधील आयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता तसेच घातपात घडवून आणण्यासाठी सहकार्य करीत होता, अशी धक्कादायक माहिती उपलब्ध झाल्याचे समजते.
आयएसकेपी या दशहतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या अब्दुल रेहमान याने बेंगळूर, नवी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी कट रचल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. आयएसकेपी संघटनेशी लागेबांधे असणाऱया काश्मीरमधील दाम्पत्याच्या संपर्कात असणारी व्यक्ती बेंगळूरमध्ये असल्याचा सुगावा दिल्लीच्या एनआयए अधिकाऱयांना लागला होता. याच्या आधारे तपास करत एनआयएने रेहमानच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला दिल्लीच्या एनआयए न्यायालयात हजर करून अधिक चौकशीसाठी एनआयए अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून लॅपटॉप, मोबाईल व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशात आंदोलने होत असताना घातपात घडविण्याचा कट आयएसआयएस या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्स (आयएसकेपी) संघटनेने रचला होता. या प्रकरणासंबंधी काश्मीरमधील दाम्पत्यासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. या कटात सहभागी असणाऱया रेहमानला एनआयएने अटक करून अज्ञात स्थळी नेऊन चौकशी चालविली आहे. रेहमान हा बांगलादेशातील दहशतवादी संघटनेचाही सदस्य असल्याचे समजते. तिहार कारागृहातील अब्दुल बसीत याच्याशी त्याचा संपर्क होता, अशी माहितीही चौकशीतून समोर आली आहे.
प्रतिष्ठित इस्पितळात नेत्रतज्ञ म्हणून काम
संशयित दहशतवादी बेंगळूरमधील एका प्रतिष्ठित इस्पितळात नेत्रतज्ञ म्हणून काम केल्याचे समजते. 2014 मध्ये त्याने सिरियामधील आयएसआयएस शिबिराला भेट देऊन जखमी झालेल्या दहशतवाद्यांवर उपचार केले. 10 दिवस सिरियामध्ये वास्तव्य केल्यानंतर तो भारतात परतला होता, असेही समजते.