बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने लसीकरणाची संख्याही वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. सध्याच्या लसीकरणाच्या दुप्पट लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहे. दरम्यान कर्नाटकाला लवकरच कोविड लसीचे १० लाख डोस मिळणार आहेत, त्यापैकी तीन लाख डोस एकट्या बेंगळूरसाठी असणार आहेत, असे राज्य सरकारने शुक्रवारी सांगितले. दरम्यान गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा यांनी ही घोषणा केली. कर्नाटकमध्ये कोविड लसींचा गंभीर तुटवडा असल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी बीबीएमपी पूर्व विभागातील आणि गोविंदराजनगर विधानसभा मतदारसंघात कोविड -१९ नियंत्रणाच्या उपायांचा आढावा घेताना सोमण्णा यांनी दावा केला की कर्नाटकात लस पुरवठा करणे काही अडचण नाही.
बीबीएमपीचे चीफ कमिश्नर गौरव गुप्ता यांनी बेंगळूरमध्ये कधीही कमतरता नोंदविली नाही. काही केंद्रावरील साठा संपलेला असताना काही केंद्रांवर पुरेसा साठा होता. त्या असमानतेकडे आता लक्ष दिले गेले आहे आणि आम्हाला तीन लाख डोस मिळत नाही तोपर्यंत मागणी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध स्टॉक पुरेसा आहे, असे ते म्हणाले.
लसीची कमतरता नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे, पण बीबीएमपीच्या स्वतःच्या लक्ष्यापेक्षा लसीकरण कमी होत आहे. बीबीएमपीने गेल्या चार दिवसांत दररोज सरासरी फक्त १९,६७७ लोकांना लस दिली आहे, तर ७० हजार लसीकरणाचे लक्ष्य आहे.