बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे हिंसाचार घडला होता. यामध्ये काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. याप्रकरणी डीजे हळ्ळी पोलिसांनी सोमवारी आंध्र प्रदेशातून कावळ बैरासंद्र येथे राहणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घराला आग लावल्याचा संशय आहे. याप्रकणी नईम (वय २९) आणि फिरदौस (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या दोघांना अटक केली गेली. हे दोघे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानी दगड आणि पेट्रोल टाकून पेटवून देत असताना दिसले. दोघेही घटना घडल्यानंतर आंध्र प्रदेशात पळून गेले होते. दोघांनाही अनंतपूर जिल्ह्यातील पाटीकोंडा या गावातून अटक करण्यात आली आहे.
इतर आरोपींचीही ओळख पटली
दुसरीकडे, डीजे हळ्ळी पोलिसांनीही त्या दिवशी १५ इतर हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला आहे. अटकेनंतर या सर्वांची बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बॉडी वॉरंटवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार निवास यांच्या निवासस्थानी हल्ला आणि वाहनांना आग लावण्याशिवाय पोलिस ठाण्यावर दगडफेक करून त्यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे.