वृत्तसंस्था/ माले, मालदिव
आयएसएलमधील संघ बेंगळूर एफसीने दक्षिण विभागीय एएफसी चषक गट ड मधील सामन्यात मालदिवच्या माझिया स्पोर्ट्स-रिक्रिएशन संघावर 6-2 अशी मात करून विजयी सांगता केली.
गेल्या वर्षी प्लेऑफमधील सामन्यात माझिया स्पोर्ट्सने बेंगळूर एफसीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. येथील सामन्यात त्यांनी त्याची परतफेड करताना प्रारंभापासून सामन्यावर वर्चस्व मिळविले आणि पूर्वार्ध संपताना त्यांनी 3-0 अशी आघाडी घेतली होती. उदांता सिंग, क्लीटन सिल्वा, लियॉन ऑगस्टिन यांनी हे गोल नोंदवले. उत्तरार्धात शिवशक्ती नारायणनने एक व विद्यासागर सिंगने त्यात दोन गोलांची भर घातली. या विजयाने बेंगळूर एफसीने गटात तीन सामन्यातून 4 गुण घेत तिसरे स्थान मिळविले.