बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत आहे. दरम्यान राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात वाढती कोरोना संख्या लक्षत घेऊन राज्य सरकारने १४ दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. मंगळवारी रात्री पासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. बेंगळूरमधील बहुतांश लोकांनी सध्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘कोरोना कर्फ्यू’ चे पालन करत घरात राहण्याचे पसंत केले असले तरी बेंगळूर शहर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली शहरातील विविध भागातून ४३४ वाहने जप्त केली आहेत.
बीसीपीने दिलेल्या आकडेवारीनुसार सकाळी दहा ते सायंकाळी आठ या दरम्यान शहरभरात तपासणी दरम्यान ३९५ दुचाकी, २२ तीन चाकी आणि १७ चारचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, अधिकृत प्रसिद्धीनुसार आपत्ती व्यवस्थापन (डीएमए) कायद्यातील संबंधित कलमांतर्गत १९ गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान गेल्या शनिवार व रविवार दरम्यान पोलिसांनी २,१५१ वाहने जप्त केली होती आणि ३९ डीएमए गुन्हे दाखल केले होते.