बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, बेंगळूरमधील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी जीएसटी परिषदेला विनंती केली आहे की सरकारला अतिरिक्त महसूल मिळावा म्हणून सर्व तंबाखूजन्य उत्पादनांवर कर वाढवावा त्याद्वारे सरकारला कोरोना लसीकरणास मदत होईल.
तज्ज्ञांचे मत आहे की तंबाखूच्या करात वाढ केल्याने कोविड काळात देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक संकटात याची मदत होईल. तसेच तंबाखू सेवन करणार्यांना आळा बसेल आणि सेवन देखील कमी होईल.
“तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढविल्याने सरकारला भरीव उत्पन्न मिळेल आणि कोट्यावधी तंबाखू पीडित व्यक्तींना तंबाखूचा वापर कमी करण्यास प्रवृत्त केले जाईल,” असे बेंगळूरचे धोरण संशोधन संस्थेचे संचालक सीथालक्ष्मी एस. यांनी सांगितले.
दरम्यान, तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे गंभीर कोविड-१९ संसर्ग होण्याचा धोका वाढल्याचा पुरावा देत ऑन्कोलॉजिस्ट विशाल राव यांनी दिली. “धूम्रपान केल्याने फुफ्फुसाचे कार्य बिघडते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. कोविड संसर्ग विकसित करणारे तंबाखू सेवन करणार्यांना अधिक संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असते,” असे म्हणत त्यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. २८ मे रोजी होणाऱ्या परिषदेच्या बैठकीपूर्वी जीएसटी परिषदेने त्यांच्या शिफारसीकडे लक्ष देण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन या गटाने केले आहे.