बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्यूची संख्याही वाढत आहे. राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान शुक्रवारी कोरोनाने बेंगळूर शहरी जिल्ह्यात उच्चांक गाठला. बेंगळूरमधील परिस्थिती लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी सांगितले की, बेंगळूरमध्ये कोरोना मृतांची संख्या १२४ पर्यंत पोहोचली असून एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणे धोकादायक असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान जिल्ह्यात पहिल्यांदाच १०० हुन अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूरमध्ये मध्ये शुक्रवारी एका दिवसात १६,६६२ कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत बेंगळूरमध्ये आयसीयू व्हेंटिलेटर बेड १० पटीने तयार करण्याचे आदेश दिले आहेत.