बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी पोलिसांनी बेंगळूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापेमारी करत रोख रक्कम, दारू, सरकारी फाईल्स व त्याच्या वरिष्ठांचे शिक्के जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
बृह बेंगळूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक देवेंद्रप्पा यांनी सिग्मिस ब्रेवरीजकडून त्यांच्या पूर्ण इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी ४० लाख रुपयांची लाच मागितली होती, अशी माहिती अँटी करप्शन ब्युरोने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
दरम्यान तक्रारीच्या आधारे सापळा रचला होता. पहिला हप्ता म्हणून जेव्हा सिग्मीसच्या अधिकाऱ्यांनी २० लाख रुपये दिले, तेव्हा देवेंद्रप्पाला रंगेहाथ पकडले. त्यांच्या कारमध्ये झडती घेतल्यास एकूण ७.४ लाख रुपये रोकड व बीबीएमपीच्या ५० हून अधिक फाइल्स मिळाल्या. देवेंद्रप्पा यांच्या निवासस्थानावरील छापामुळे १२० दारूच्या बाटल्या, विविध प्रकारच्या गाड्या, अनेक बँक खाती, निश्चित ठेवी आणि ४३० बीबीएमपी फाइल्स ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, या अधिकाऱ्याने आपल्याबरोबर वरिष्ठांचे शिक्के घेत असल्याचेही आढळून आले. उत्पादन शुल्क विभाग मोठ्या प्रमाणावर दारू बाळगल्याबद्दल त्याच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी करेल, असे या निवेदनात म्हटले आहे.