वृत्तसंस्था/ कोलकाता
आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये बुधवारी येथे एफसी बेंगळूर युनायटेड आणि एआरए एफसी अहमदाबाद यांच्यात चुरशीचा सामना होणार असून या सामन्यात बेंगळूरचा संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
हिरो पुरस्कृत आय लीग पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत बेंगळूर युनायटेड एफसी संघाने आतापर्यंत एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे. बुधवारच्या सामन्यात बेंगळूरचा संघ दर्जेदार कामगिरी करून विजय मिळवेल, असा विश्वास या संघाचे प्रमुख प्रशिक्षक रिचर्ड हुड यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेतील बेंगळूर युनायटेड संघाचे शेवटचे दोन सामने बाकी आहेत. दरम्यान अहमदाबादच्या एआरए एफसी संघाला यापूर्वीच्या सामन्यात स्थानिक बलाढय मोहमेडन एफसी संघाकडून 1-4 अशा गोल फरकाने पराभव पत्करावा लागला होता. बेंगळूर आणि अहमदाबाद संघांनी या पात्र फेरीच्या स्पर्धेतील आपले सलामीचे सामने गमविले आहेत.