बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने पूर्ण लोकडाऊन लागू केला आहे. राज्यात १० मे ते २४ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन केला होता. राज्य सरकारने पुन्हा हा लॉकडाऊन वाढवून ७ जून पर्यंत केला आहे. सरकारने पूर्ण लॉकडाऊनसाठी कोरोना नियमावली जाहीर केली आहे. तरीही नागरिक या नियमांचे उल्लंघन करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
दरम्यान बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने बहुतांश नागरिकांनी ७ जूनपर्यंत राज्यभर जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन करण्याचे ठरविले आहे. तरीही काही नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर बेंगळूर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बेंगळूर शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत शहरातील विविध भागातून ९९८ वाहने जप्त केली. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली. मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे.
बेंगळूर शहर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरभर तपासणी दरम्यान ८६८ दुचाकी, ५४ तीनचाकी आणि ६६ चारचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, एका अधिकृत प्रसिद्धीनुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या (एनडीएमए) संबंधित कलमांतर्गत ५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.