बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरच्या कारागृहातून नुकत्याच सुटलेल्या आणि कोरोनावर उपचार घेणाऱ्या माजी एआयएडीएमकेच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना व्हिक्टोरिया रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समर्थक रुग्णालयाबाहेर जमले.
शशिकला यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी व्हिक्टोरिया हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश कृष्णा यांनी पत्रकारांशी बोलताना शशिकला यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
शनिवारी बेंगळूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने (बीएमसीआरआय) जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये असे म्हटले होते की, शशिकला यांची प्रकृती ठीक आणि स्थिर आहे. बीएमसीआरआयने शनिवारी सांगितले की, डॉक्टरांच्या पथकाने निर्णय घेतला आहे की शशिकला निगेटिव्ह आहेत आणि रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात यावा.
दरम्यान शशिकला कारागृहात असताना त्यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शशिकला यांना २७ जानेवारी रोजी अधिकृतपणे न्यायालयीन कोठडीतून सोडण्यात आले.