बेंगळूर/प्रतिनिधी
ड्रग प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री संजना गलराणीची पोलीस कोठडी संपल्यामुळे तिला बुधवारी प्रथम अपर मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी (एसीएमएम) न्यायालयात हजर केले असता तिला १८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजनाला परप्पन अग्रहरा तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी म्हटले आहे की, संजनाचा मित्र राहुलला तिच्या अटकेच्या काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर बारकाईने नजर ठेवली होती. सीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलच्या विधानाच्या आधारे ८ सप्टेंबर रोजी संजनाच्या राहत्या घरी छापे टाकण्यात आले. त्या दिवशी तिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत असून या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.