बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. दरम्यान बेंगळूरमध्ये संपामध्ये सहभागी झालेल्या आणि कर्तव्याची नोंद न घेतलेल्या १२० प्रशिक्षणार्थी आणि प्रोबेशनरी कर्मचार्यांना बीएमटीसीने शुक्रवारी कामावरून काढून टाकले. दरम्यान गुरुवारीही ९६ प्रशिक्षणार्थींवर अशीच कारवाई केली होती.
बीएमटीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ६० प्रशिक्षणार्थी आणि ६० प्रोबेशनरी कर्मचार्यांना शुक्रवारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. संपाच्या पहिल्या दिवसापासूनच बीएमटीसी व इतर सरकारी बस महामंडळांनी कर्मचार्यांना ताकीद दिली आहे की त्यांनी पुन्हा कामावर रुजू न झाल्यास ते अडचणीत येतील.
केएसआरटीसीने २४४ ड्रायव्हर्स व कंडक्टर, पाच ट्रॅफिक सुपरवायझरी स्टाफ मेंबर, ३४ मेकॅनिकल कर्मचारी आणि इतर ९ जणांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. “ते इतर कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास उद्युक्त करत आहेत आणि त्यांना धमकावत आहेत. यामुळे कॉर्पोरेशन बसेस चालविण्यास अडथळा निर्माण झाला होता आणि त्यामुळे प्रवासी जनतेची गैरसोय होत होती, ”केएसआरटीसीने एका निवेदनात म्हटले आहे.