15 मार्च रोजी होणार फुटबॉलपटूंची घोषणा
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेनुसार बेळगावातील होतकरू फुटबॉलपटूंची गुणवत्ता पाहण्यासाठी 13 ते 17 वयोगटातील फुटबॉलपटूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. त्या निवड चाचणीची पडताळणी करण्यासाठी बेंगळूरहून कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱयांनी भेट घेऊन या खेळाडूंची अंतिम यादी निश्चित केली आहे.
लेले मैदानावर बेळगाव जिल्हा संघटनेने निवडलेल्या 200 खेळाडूंची बेंगळूर फुटबॉल संघटनेचे सभासद रोहित थोरात व सचिन बिडकर यांनी पडताळणी केली. दोन सत्रात या खेळाडूंच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली. अंतिम यादी 15 मार्च रोजी घोषित करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या सुचनेनुसार उत्तर कर्नाटकातील विविध जिल्हय़ातून या फुटबॉल निवड चाचण्या घेण्यात आल्या. यावेळी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, पॅट्रॉन राम हदलग, उपाध्यक्ष विनायक जाधव, सचिव अमित पाटील आदी उपस्थित होते.