बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात १० मेपासून पूर्ण लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. यावेळी राज्यात कडक निर्बंध असणार आहेत. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, बेंगळूरमध्ये उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री के.सुधाकर यांनी दिली आहे. बेंगळूरमध्ये मृत्यू झालेल्या अर्ध्याहून अधिक रुग्ण १८ ते ४४ वयोगटातील आहेत. दरम्यान ज्यांनी नोंदणी केली आहे आणि को-विन पोर्टलवर लसीकरणाची वेळ निश्चित केली आहे त्यांनाच लसीकरण केले जाईल. इतरांना लसीकरणासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे म्हंटले आहे.
बेंगळूरमध्ये १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी कोविड -१९ लसीकरण १० मेपासून सुरु होणार असून सर्व प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लस उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
“ सोमवारपासून कोविड -१९ लसीकरण केसी जनरल हॉस्पिटल, जयनगर जनरल हॉस्पिटल, सर सीव्ही रमण जनरल हॉस्पिटल, सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, ईएसआय हॉस्पिटल्स आणि निमहन्स बेंगळूर येथे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.”