पायाभरणी होऊन चार वर्षे होत आली, तरी पूल पूर्णत्वास जाईना, काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी /सांगे
स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना पुलाची कामे लवकर पूर्ण होत असत. मात्र त्यानंतर कुठे काय झाले हे कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीत बेंडवाडा-सांगे येथील पुलाचे काम रखडणे चालूच आहे. प्रथम कोरोनाने या पुलाच्या बांधकामात विघ्न आणले, ते अजूनही सुटलेले नाही. या पुलाचे काम गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बंदच आहे. ठरावीक कालावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने मूळ खर्चही वाढतो. एकूणच चित्र पाहता हा पूल कधी बांधून पूर्ण होईल हे सांगता येत नाही.
सांगे मतदारसंघातील बेंडवाडा-सांगे हा पूल कुडचडे व सांगेला जोडत असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. नदीवर असलेला सदर पोर्तुगीजकालीन पूल कमकुवत बनल्याने सरकारने गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळामार्फत पर्यायी चार पदरी नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. याकरिता सुमारे 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मूळ नियोजनानुसार 2021 पर्यंत सांगेवासियांना वाहतुकीसाठी नवीन पूल उपलब्ध होणार होता. पण पायाभरणी होऊन आता तब्बल तीन वर्षे नऊ महिने पूर्ण झाले, तरी पूल काही पूर्ण होईना. समांतर पूल बांधण्यासाठी 28 जानेवारी, 2019 ला पायाभरणी करण्यात आली होती.
येथे समांतर पूल बांधण्याची मागणी खूप जुनी असून तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते कोनशिला बसविण्यात आली होती. तेव्हा लोकांना वाटले होते की, नवीन पुलाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. पण अजूनपर्यंत पुलाच्या कामाने गती घेतलेली दिसून येत नाही. येत्या जानेवारीत पायाभरणीला चार वर्षे पूर्ण होणार आहेत. वास्तविक कोरोना महामारीचा फटका नूतन पुलाच्या बांधकामाला मार्च, 2020 मध्ये बसला होता.
पर्यायी पूल आवश्यक
एकेकाळी खनिज वाहतुकीने बेंडवाडा येथील सध्याचा पूल गजबजून जात होता. खनिजवाहू ट्रकांची वर्दळ जेव्हा सुरू होती तेव्हा पर्यायी पूल होणे किती महत्त्वाचे होते हे प्रामुख्याने जाणवत होते. मुळात हा जुना पूल अरुंद असून एकाच वेळी दोन वाहनांना ये-जा करायला मिळत नाही. त्यामुळे पर्यायी पुलाची गरज जास्त भासू लागली होती. नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर साडेसहा महिन्यांनी प्रत्यक्ष कामाला जोरात सुरुवात झाली होती. पण त्यानंतर कोरोना आला आणि काम जे बंद पडले ते अजूनही गती घेऊ शकलेले नाही. सध्याचे चित्र पाहता कंत्राटदारही सुस्तावलेला दिसतो.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी
पूल-पूल करून एका आमदाराची पाच वर्षे संपली. त्यातच फेब्रुवारी, 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊन भाजपचे सुभाष फळदेसाई हे आमदार म्हणून निवडून आले. परंतु अजून काही बंद पडलेले काम सुरू झालेले नाही. त्यातच पुलाच्या कामाचा ठेकेदार सरकारलाही जुमानत नाही अशी माहिती मिळाली आहे. या कामचुकार आणि चालढकल करणाऱया कंत्राटदारावर सरकारने कारवाई करण्याची मागणी होत आहे. या कंत्राटदारावर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समोर ताशेरे ओढलेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्वरित पुलाचे काम सुरू करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी सांगेवासीय करत आहेत.