किरण ठाकुर यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
चित्रकार हा व्यक्तीच्या जीवनातील भाव आपल्या कलेच्या माध्यमातून कागदावर रेखाटत असतो. व्यक्तीच्या चेहऱयावरील हेच भाव चित्रकार शिवाजी बेकवाडकर यांनी आपल्या चित्रांमधून रेखाटले आहेत. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी किरण ठाकुर म्हणाले, चित्रकारांच्या कलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी सुरू करण्यात आली. नवनवीन चित्रकारांना त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन या सुसज्ज जागेत भरविता येत आहे. बेळगाव ही कलाकारांची खाण असून, आजवर येथे अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत. यापुढेही ते घडत रहावे यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू असे सांगत चित्रकार शिवाजी बेकवाडकर यांच्या चित्रांचे कौतुक केले.
प्रास्ताविक करताना व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी शिवाजी बेकवाडकर यांच्याविषयी माहिती देत के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी विषयी माहिती दिली. मध्यंतरी कोरोनामुळे प्रदर्शने थांबली होती. परंतु चित्रकारांनी ही मरगळ बाजुला करत पुन्हा एकदा आपली कला लोकांसमोर मांडली. बेळगावचे चित्रप्रेमी या प्रदर्शनाला नक्कीच भेट देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
चित्रकार शिवाजी बेकवाडकर यांनी आपल्या जीवनातील प्रवास उलगडत व्यवसाय सांभाळत चित्रकला कशी जोपासली हे सांगितले. बेळगाव परिसरातील चित्रकार व शिवाजी बेकवाडकर यांच्या मित्रपरिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकार शिरीष देशपांडे, अशोक ओऊळकर, चंद्रशेखर रांगणेकर, सचिन उपाध्ये, सुभाष देसाई, जे. बी. फडके व शोभा फडके, रिती पावटे यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
चित्रकार शिवाजी यांनी रेखाटले शिवाजी महाराजांचे चित्र
व्यक्तींच्या भावभावनांना हात घालत चित्रकार शिवाजी बेकवाडकर यांनी अनेक व्यक्तीचित्रे रेखाटली आहेत. रेणुका देवीचा जोगवा असो व निसर्गाची विविध रुपे असो, त्यांनी अप्रतिम साकारली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे कौतुक किरण ठाकुर यांनीही केले. या प्रदर्शनात एकूण 46 चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. टिळकवाडी येथील वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये 14 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे.