नंदगड / वार्ताहर :
प्राथमिक शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थी नसल्याने शिक्षकांना शाळेत बसून जावे लागत आहे. फावल्या वेळेचा सदुपयोग घेऊन विद्यार्थ्यांसाठी मास्क शाळेतच बनविण्याचा उपक्रम बेकवाड ता. खानापूर येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी घेतला आहे.
सरकारच्या आदेशानुसार शाळा कधीही सुरु होवोत, परंतु विद्यार्थ्यांना वर्षभर मास्क वापरावाच लागणार आहे. सर्वच मुलांच्याकडे मास्क असतीलच असे नाही. शाळेतील सर्वच विद्यार्थ्याना मास्क मिळावा व कोरोनाचा प्रसार रोखावा हा दृष्टीकोन बेकवाड शाळेतील शिक्षकांनी समोर ठेवली. शाळेतील सात शिक्षक एकत्र आले. त्यांनी स्वइच्छेने रक्कम जमा करुन मास्क तयार करण्याचे काम करीत आहेत. आपले शैक्षणीक काम सांभाळत फावल्या वेळेत हा उपक्रम सुरु आहे.
मास्क बनविण्यासाठी दर्जेदार कापड आणण्यात आले आहे. दुपदरी कापड लावून किमान वर्षभर तरी मास्क विद्यार्थ्यांना वापरता यावा, याकडे विशेष लक्ष दिले आहे. सध्या शाळेत 162 विद्यार्थी आहेत. परंतु 200 मास्क बनविण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. मास्क बनविण्यासाठी काही शिक्षकांनी आपल्या घरातील शिलाई मशीन आणल्या आहेत. तर गावात ज्यांच्याकडे शिलाई मशीन विनाकाम पडून आहेत. त्या चार-आठ दिवसाकरिता वापरण्यासाठी आणल्या आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील, सहशिक्षक व्ही. :एस. चरंतीमठ, एम. के. पाटील, पी. बी. धबाले, व्ही. बी. जाधव, आर. सी. उडकेकर, ए. पी. पाटील यांचे याकामी विशेष परिश्रम सुरु आहेत. सीआरपी मेदार यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांच्या कार्याचे कौतूक केले.