प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्षं केले जात असल्याचे आता स्पष्ट झाले असून पंधरवडय़ापूर्वी एका रात्रीत बेकायदा उभ्या राहिलेल्या गाडय़ावर कारवाई करण्यास पालिकेने कोणतीही पावले उचललेली नाहीत. रविवारी सदर गाडा उभारलेल्या जागेत पत्रे लावून हे बेकायदा कृत्य झाकण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिसून आले.
पालिकेने एका रात्रीत उभ्या राहिलेल्या सदर बेकायदा गाडय़ावर तत्काळ कारवाई करण्याची गरज होती. सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून या बेकायदा प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले होते. नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनाही आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून येते.
पालिकेच्या तांत्रिक विभागाकडून पालिकेपासून शंभर मीटरवर असलेल्या या बेकायदा गाडय़ावर स्वत:हून कारवाई करण्याचे सोडाच, प्रसारमाध्यमे वा अन्य कोणी बेकायदा प्रकार नजरेस आणून दिला, तरी प्रकरण गंभीरपणे घेतले जात नसल्याने टेबलाखालून व्यवहार होत असल्याची शंका घेण्यास वाव मिळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रभाग-14 चे स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक यांनी आपण हे प्रकरण पालिका अभियंत्यांच्या नजरेस आणून त्यावर कारवाई करण्यास सांगणार असल्याचे सांगितले होते. त्यांनीही घुमजाव केल्याचे दिसून येत आहे.
मडगाव पालिकेपासून जवळच असलेल्या बोरकर सुपर मार्केटच्या समोरील जागेत हा गाडा रातोरात उभारण्याचा प्रकार घडला होता. एक गाडा उभा राहील एवढय़ा त्या जागेत आधी झाडेझुडुपे होती. गाडा उभा राहण्याच्या आठवडाभर पूर्वी कोणी तरी ती छाटून टाकली होती. त्यानंतर तीन-चार दिवसांनी येथे एक पक्का गाडा उभा राहिल्याचे दिसून आले होते. सदर गाडा तयार करून येथे आणून बसविण्यात आला असण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
मडगाव शहरातून हटविलेल्या गाडेचालकांचे कित्येक दशके झाली, तरी अजूनही कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नसून असे असताना रातोरात बेकायदा गाडे उभे राहण्याचे प्रकार घडत आहेत. पालिकेचे अशा प्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरी भागात पालिकेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे.