प्रतिनिधी/बेळगाव
घातक कोरोना थांबविण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच मद्यविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात बेकायदा दारू वाहतूक व गावठी दारूची विक्री करणाऱया 353 ठिकाणांवर धाडी टाकून 21 जणांना अटक करण्यात आली आहे. अबकारी विभागाने ही कारवाई केली आहे.
24 मार्चपासून आतापर्यंतच्या पंधरवडय़ात संपूर्ण जिल्हय़ात कारवाई करण्यात येत आहे. वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. 37 गुन्हे दाखल करून 21 जणांना अटक करण्यात आली असून 12 हजार 340 लिटर बेकायदा दारू, 27 लिटर गोवा बनावटीची दारू, 40 लिटर शिंदीची दारू, 50 लिटर गुळाचे रसायन, 17 हजार 280 लिटर संत्र्याची दारू, 10 लिटर काजूची दारू, 538 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
अबकारी उपायुक्त बसवराज यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. जिल्हय़ात 25 दुचाकी, 1 ऑटोरिक्षा, दोन गुड्स वाहने अशी एकूण 27 वाहनेही जप्त केली असून जप्त वाहनांची किंमत 22 लाखांच्या घरात आहे. दारुविक्री बंदीच्या काळात गावठी व बेकायदा दारुचा सुळसुळाट वाढणार हे लक्षात घेऊन अबकारी विभागाने पथके तैनात केली होती.
संपूर्ण जिल्हय़ात खास करून महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर काटेकोरपणे वाहनांची तपासणी करण्याबरोबरच डोंगराळ भागात जिथे गावठी दारू तयार केली जाते, त्या अड्डय़ांवर छापे टाकण्यात आले, अशी माहिती अबकारी उपायुक्तांनी दिली आहे. अबकारी विभागाने सॅनिटायझरचा तुटवडा लक्षात घेऊन पोलीस, आरोग्य, जिल्हा इस्पितळ, माहिती खाते आदी वेगवेगळय़ा खात्यांना 9,150 लिटर सॅनिटायझरचे वाटप केले आहे.