चालकाचे नियंत्रण सुटल्याने अडलूर येथे अपघात : 5 लाख रुपये किमतीची दारूची चोरटी वाहतूक
प्रतिनिधी / कारवार
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडलूर येथे (राष्ट्रीय हमरस्ता क्र. 63) कंटेनर पलटी झाला आणि त्याचबरोबर गोवा बनावटीच्या दारूच्या चोरटय़ा वाहतुकीचे मोठे घबाड समोर आले. महाराष्ट्र पासिंगच्या कंटेनरमधून सुमारे 5 लाख रुपये किमतीची दारूची चोरटी वाहतूक करण्यात येत होती, असे सांगण्यात आले. कंटेनर पलटी झाल्याने बीयरच्या टीनसह अन्य ब्रँडच्या दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या गेल्या होत्या. याचा फायदा काही स्थानिक मद्यप्रेमींनी उठविला असे सांगण्यात आले.
घटनेचे वृत्त समजताच अंकोला पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने अन्य काही मद्यपींना संधीचा लाभ उठविता आला नाही, असेही सांगण्यात आले. महाराष्ट्र पासिंगचा हा कंटेनर गोव्यातील दारू कारवार, अंकोला, यल्लापूरमार्गे हुबळीकडे घेऊन निघाला होता, असे समजते. कंटेनर पलटी झाल्यानंतर चालक आणि क्लिनरने घटनास्थळावरून पलायन केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केवळ दारूच नव्हे तर अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोव्यातून एखाद्या वाहनांना गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील माजाळी (पोळेम) कर्नाटक आणि गोवा सरकारच्या वेगवेगळ्या तपासणी नाक्यांना सामोरे जावे लागते. माजाळी (कर्नाटक) आणि गोवा (पोळेम) या दोन तपासणी नाक्यामधील अंतर जेमतेम शंभर ते दीडशे मीटर आहे. पोळेम तपासणी नाका उत्तरेला तर माजाळी तपासणी नाका दक्षिणेला आहे. पोळेम तपासणी नाक्यावर गोवा आरटीओचे कार्यालय तसेच गोवा पोलीस चौकी कार्यरत आहे. तर माजाळी तपासणी नाक्यावर पोलीस वन अबकारी आणि महसूल खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. आता यामध्ये कोविड तपासणी नाक्याची भर पडली आहे. दोन राज्य सरकारांचे एवढे तपासणी नाके असूनही एखादा कंटेनर दारूच्या लाखो रुपये किमतीच्या बाटल्या भरून कसा काय तपासणी नाक्याचे अडथळे पार करतो, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे तर तपासणी नाक्यावर पाणी खोलपर्यंत मुरतय, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दोन-चार बॉटलची चोरटी वाहतूक करणाऱयांना ताब्यात घेऊन दैनिकामध्ये पोझ देणाऱया अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी आणि कर्मचाऱयांकडून दारूची चोरटी वाहतूक करणारा कंटेनर तो पण महाराष्ट्र पासिंगचा नजरेतून कसा काय चुकतो? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. त्याचबरोबर विविध खात्याच्या कर्मचाऱयांच्या भागीदारीनेच या प्रकारचे धंदे चालतात, असा अरोप केला जात आहे. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.