प्रतिनिधी/सातारा
बेकायदा पिस्टल व चार जिवंत काडतूस विक्रीसाठी घेवून आलेल्या पुण्याच्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत जेरबंद केले आहे. अटक केलेल्या पुण्याच्या संशयितांकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, 4 जीवंत काडतूस, 2 मोबाईल हॅन्डसेट, ऍक्टिव्हा दुचाकी असा एकूण 1 लाख 15 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जावेत सुलतान शेख वय 37 रा. अशोकनगर, येरवडा, पुणे, इरफान हुसेन शेख वय 35 रा. कोंढवा, पुणे व अमोल पाखरे रा. अशोकनगर, येरवडा पुणे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत झाली असून दि. 21 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दोन व्यक्ती शिरवळ, ता. खंडाळा येथील पंढरपूर फाटय़ावर बेकायदा पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकास आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे रमेश गर्जे व पथकाने पंढरपूर फाटा येथे सापळा लावला असता दोन इसम दुचाकीवरुन पंढरपूर फाटा येथे आले होते. त्यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्टल, 4 जिवंत काडतूस, दोन मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला. तो हस्तगत करुन त्यांच्या विरुध्द शिरवळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, रोहित निकम, सचिन ससाणे, पंकज बेसके, विजय सावंत, अमित सपकाळ, विशाल पवार यांनी सहभाग घेतला होता.