प्रतिनिधी/ म्हापसा
बेकायदा व्यवसाय कायदेशीर करण्याची मजल मारण्याचा विचार करणे म्हणजे सरकारच्या दारिद्रयाचे लक्षण आहे. मटका व्यवसाय कायदेशीर करून मंत्री मायकल लोबो सरकारला नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. सध्या सरकार आर्थिकदृष्टय़ा कमजोर असून मटका कायदेशीर करणे म्हणजे सरकारचे दिवाळखोर करण्याजोगी आहे. असे मत गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर हळदोणा गट काँग्रेसचे सरचिटणीस आश्वीन डिसोझा उपस्थित होते. पुढे बोलताना मटका व्यवसाय कायदेशीर करणे सुशिक्षित गोव्याला शोभत नाही. मटका व्यवसाय कायदेशीर करावा असे सांगून मंत्री मायकल लोबो यांनी तमाम गोमंतकीयांचा अपमान केलेला आहे. यामुळे मंत्री लोबो यांनी तमाम गोमंतकीयांची माफी मागावी असे सांगून अमरनाथ पणजीकर पुढे म्हणाले की, कुठलाही जुगार व्यसनच आहे. सरकारला आर्थिक उत्पन्न मिळावे या हेतूने मटका या बेकायदा व्यवसायाला कायदेशीर करणे हा मार्ग कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी सुचविल्याबद्दल आश्चर्यच वाटते. त्यांच्या वक्त्यव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकार नेमके कुठल्या दिशेने मार्गक्रमण करतेय व तरुण पिढीला सरकार नेमका कोणता संदेश देतेय हे मायकल लोबो यांच्या मटका व्यवसायासंदर्भातील भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. आता सरकारला आर्थिक उत्पन्न मिळतेय या हेतूने आता लोबो यांनी वेश्या व्यवसायसुद्धा कायदेशीर करायला पुढाकार घ्यावा असा टोलाही श्री. पणजीकर यांनी हाणला. असा संदेश आता लोकांत पसरणार आहे. असे नमूद करून श्री पणजीकर यांनी पुढे सांगितले की, मटक्याच्या विषयासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही आम्ही निषेध करतो, कारण मायकल लोबो यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मंत्रिमंडळातील सदस्याने काहीही बोलले तरी चालेल स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकली पाहिजे. अशीच मुख्यमंत्री सावंत यांची अप्रत्यक्ष भूमिका त्याद्वारे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.