वार्ताहर / शिरवळ :
खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी भाजी विक्री करणाऱ्या महिलेला 10 टक्के व्याजाने पैसे देत व्याज व मुद्दल अशी 5 हजार रुपयांची मागणी करत हाताने मारहाण करून शिवीगाळ करीत भाजीपाला विकण्याचा वजन काटा घेऊन जात बेकायदेशीर सावकारी केल्याप्रकरणी अंगणवाडी सेविका कमल शंकर शिंदे (वय 55,रा.शिवाजी कॉलनी,शिरवळ ता.खंडाळा) यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कायद्यांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा येथील भाजी मंडईमध्ये चंद्रभागा लक्ष्मण चव्हाण (वय 50) या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, चंद्रभागा चव्हाण यांना जानेवारी 2021 मध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर भाजीपाला खरेदी करणेचा असल्याने शिरवळ येथील अंगणवाडी सेविका कमल शिंदे यांना चंद्रभागा चव्हाण यांनी उसने 2 हजार रुपये मागितले असता कमल शिंदे यांनी मी उसने पैसे देत नाही तुला व्याजाने पैसे पाहिजे असतील तर सांग असे म्हणाल्या. यावेळी कमल शिंदे यांनी चंद्रभागा चव्हाण यांना 2 हजार रुपयांपैकी 200 रुपये व्याजाचे पैसे वजा करीत 1800 रुपये दिले. यावेळी चंद्रभागा चव्हाण यांनी साधारणपणे सलग 8 ते 9 महिने 200 रुपये प्रमाणे व्याज कमल शिंदे यांना दिले. यावेळी नोव्हेंबर व डिसेंबर 2021 असे सलग दोन महिने व्याजाचे पैसे देता न आल्याने शिंदे यांनी भाजीपाला विक्रीचा वजन काटा घेऊन गेल्या असता चंद्रभागा चव्हाण यांनी परत वजन काटा कमल शिंदे यांच्या पतीकडून आणला होता.
दरम्यान, 23 जानेवारी रोजी 12 वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथील भाजीमंडई याठिकाणी चंद्रभागा चव्हाण या भाजीपाला विक्री करीत असताना कमल शिंदे ह्या त्याठिकाणी येत आत्ताच्या आत्ता व्याज व मुद्दल मिळून 5 हजार रुपये दे असा तगादा कमल शिंदे यांनी लावला असता चंद्रभागा चव्हाण यांनी 2 हजार रुपये फक्त देणार असल्याचे सांगताच कमल शिंदे यांनी चंद्रभागा चव्हाण यांना हाताने मारहाण करीत शिवीगाळ करीत भाजीपाला विक्रीचा वजन काटा भाजी मंडईमधून घेऊन गेल्या. याबाबतची फिर्याद चंद्रभागा चव्हाण यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून कमल शिंदे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.