7 हातगाडे फळांसह जप्त, सर्वांकडून दंड वसूल
प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेने सोमवारी सायंकाळी बेकायदा फळविक्री करणाऱया हातगाडय़ांच्या विरोधात राबविलेल्या कारवाई मोहिमेत सात हातगाडे फळांसह जप्त करण्यात आल्याची माहिती मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस यांनी दिली. मडगाव पालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी दुर्गा पेट्रोल पंप, बिनलिक्स इमारत, हॉटेल साज, बसस्थानकाजवळ, रवींद्र भवन रोड आदी परिसरांत पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करून हातगाडय़ांना कोणताही परवाना नसताना बेकायदा फळविक्री करताना मडगाव पालिकेच्या कारवाई पथकाने सात हातगाडे फळांसह जप्त केले. मडगाव पालिका क्षेत्रात बेकायदा हातगाडे घेऊन फळे व अन्य साहित्याची विक्री करण्याचे प्रकार अलीकडे वाढले असून पालिकेकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे तक्रारी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्याधिकाऱयांनी निर्देश दिल्यानंतर मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस आणि सीमा घोडगे यांनी पालिकेचे कामगार घेऊन सदर कारवाई केली. सात हातगाडे फळांसह जप्त केले असले, तरी हातगाडे मालकांना दंड ठोठावून फळे परत करण्यात आल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली. एकंदरित सर्वांकडून मिळून 3500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हातगाडे मात्र पालिकेने परत केलेले नाहीत, असे सांगण्यात आले.
सलग मोहीम राबवावी
सोमवारच्या मोहिमेत पालिकेने 7 बेकायदा हातगाडे जप्त केले असले, तरी ही संख्या नगण्य असल्याची प्रतिक्रिया एका माजी नगरसेवकाने व्यक्त केली. असे शेकडो बेकायदा हातगाडे पालिका क्षेत्रात बेकायदा व्यवसाय करत असतात. त्यामुळे पालिकेने एकदा कारवाई करून डोळय़ांना पाणी लावण्याचा प्रकार न करता सलग कारवाई मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरी भागातच सायंकाळच्या वेळी सुमारे दीड-दोन डझन बेकायदा हातगाडे रस्त्यांवर आढळून येतात, असे त्यांनी नजरेस आणून दिले.