काहीकाळ वाहतूक ठप्प झाल्याने गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरुवारी बेकिनकेरे-उचगाव मार्गावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
बेकिनकेरे-उचगाव मार्गावरील बेकिनकेरे गावाजवळ झाड कोसळले. यामुळे दोन तासाहून अधिककाळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. भर रस्त्यावर झाड कोसळल्याने संपूर्ण रस्ता झाकला गेला. परिणामी महाराष्ट्र शासनाची बसदेखील माघारी परतली. काही वाहनधारकांना झाड हटविण्याच्या प्रतीक्षेत थांबावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने घरे व झाडे पडझडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. वादळी पावसाने या मार्गावरील धोकादायक झाडे किंवा झाडांच्या फांद्या भर रस्त्यावरच कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वनखात्याने पाहणी करून तातडीने धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.