काही लोक मनाने खूप श्रीमंत असतात…..
जीवनात अनेक श्रीमंत पाहिले असतील, पण कधी कुठल्या मनाने श्रीमंत असलेला व्यक्ती पाहिला आहात का? सोशल मीडियावर व्हायरल एका छायाचित्राने लोकांची मने जिंकली आहेत. काही लोक या व्यक्तीची ‘श्रीमंती’ पाहून त्याला सॅल्युट करत आहेत. आयपीएस अधिकाऱयाने हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यावर ते इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहे. हे छायाचित्र कधी आणि कुठे काढण्यात आले याची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही.
हे छायाचित्र आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ट्विटरवर शेअर केले. ‘काही लोक इतके गरीब असतात की त्यांच्याकडे देशासाठी केवळ ‘पैसे’ असतात आणि काही मनाने प्रचंड श्रीमंत असतात’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या ट्विटला आतापर्यंत 1200 हून अधिक लाइक्स आणि 133 हून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी या छायाचित्राला हृदयस्पर्शी ठरविले आहे.
या छायाचित्रात रस्त्याच्या कडेला एक सायकलरिक्षा उभी असल्याचे आणि त्यात दिवसभर काबाडकष्ट केलेला एक व्यक्ती झोपल्याचे दिसून येते. या सायकलरिक्षाच्या वरच्या हिस्स्यात दोन श्वान झोपले आहेत. हे छायाचित्र पाहून या व्यक्तीकडे स्वतःचे घर नसल्याचे समजून येते. परंतु तरीही त्याने स्वतःच्या सायकलरिक्षावर मुक्या प्राण्यांना आसरा दिला आहे. या व्यक्तीच्या मनाच्या मोठेपणाने लोकांना भावुक करून सोडले आहे.