एकटी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
एकटी संस्थेतर्फे `स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त प्रामुख्याने बेघर मानसिक आजारी महिलांचा प्रश्न घेऊन संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बेघर स्त्री-पुरूषांचा सर्व्हे संस्थेकडून करण्यात आला आहे. यामध्ये 10 स्त्री तर पुरूषांमध्ये 8 बेघर असाध्य मानसिक आजाराने त्रस्त आहेत. महिलांचे प्रमाण अधिक असून बेघर मानसिक रुग्णांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशी माहिती एकटी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी संजय पाटील म्हणाले, महिलांवर विविध प्रकारच्या हिंसा होतात. यामध्ये शारिरीक, मानसिक हिंसेचा समावेश आहे. मानसिक आजारी महिलांना घरचे लोक सांभाळत नसल्याने त्या रस्त्यावर येतात. त्यांच्यावर अत्याचार होऊन गैरफायदा घेतला जातो. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार आदी सुविधांपासून वंचित रहावे लागते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, स्त्री हिंसाविरोधी पंधवडयाच्या निमित्ताने मानसिक आजारी स्त्रीयांच्या प्रश्नावर समाज, शासन, प्रशासनाचे लक्ष वेधणे. तसेच त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने ठोस कृती व्हावी, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विश्वस्त डॉ.मंजुळा पिशवीकर, डॉ.अर्चना जगतकर, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, सौरभ पाटील, अनुप्रिया कदम, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.
एकटी संस्थेचे कार्य
एकटी संस्था ही समाजातील एकल, विधवा, परीतक्ता, घटस्फोटीत, मानसिक आजारी, बेघर महिला व पुरूषांकरिता कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. संस्थेचे कार्य गेल्या आठ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. तर गेल्या 3 वर्षांपासून दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत 4 बेघर निवारे कार्यान्वित आहेत. यापैकी दोन निवारे महिलांकरिता व दोन निवारे पुरुषांकरिता कार्यान्वित आहेत.
संस्थेचा कृती कार्यक्रम असा
बेघर मानसिक आजारी महिलांना कायमस्वरुपी निवारा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांना निवेदन, गांभीर्य कार्यशाळा, निवेदनाव्दारे लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देणे, आनंद मेळावा, निर्भया पथक सक्षम करावे, शाहूवाडी, चंदगड, आजरा आदींसारख्या दूर्गम तालुक्यातील वाडया-वस्त्यांपर्यंत रस्ते बांधणी व दुरूस्ती करावी, यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन, निवाऱयातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर आदी विविध उपक्रमांचा संस्थेच्या कृती कार्यक्रमात समावेश आहे.