वार्ताहर / बेडकिहाळ
ऊस उत्पादक, शेतकरी, सभासदांच्या हितासाठी जवाहर साखर कारखाना (हुपरी)चे संस्थापक कलाप्पाण्णा आवाडे व आमदार तसेच अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या मार्गदनाखाली योजना राबवून हित जोपासत शेतकऱयांची आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. यंदा उच्चांकी ऊस गाळप करणार असल्याचे मत कारखान्याचे केन कमिटीचे अध्यक्ष राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. शमनेवाडी येथील युवा शेतकरी ऋषभ उमाजे, बाहुबली शिरगुप्पे, शीतल खोत, अमित भेंडवाडे, विनय खोत यांनी सदलगा अर्बन बँक व जवाहर कारखान्याच्या विशेष सहयोगाने ऊसतोडणी यंत्र घेतले आहे. या नूतन यंत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याचे पूजन गुंडू उपाध्ये व उदय पुजारी यांनी केले. तर श्रीफळ विजयकुमार खोत, माजी ता. पं. अध्यक्ष जयकुमार खोत, जि. पं. सदस्य सुदर्शन खोत, युवा नेते उत्तम पाटील, जवाहरचे संचालक अशोक नारे, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, सदलगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, बाबासाहेब खोत, माजी जि. पं. सदस्य अशोक आरगे, डॉ. बी. ए. भोजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ऊस उत्पादक सभासद शंकर महादेव कमते यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी विमल यांना सभासद हित संरक्षण योजनेंतर्गत 50 हजार रुपये सहाय्य धनादेशाचे वितरणही राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.