आपला जीव ज्याच्यावर जडला आहे, त्याच्यासाठी कोण काय करेल, काही सांगता येत नाही, हेच खरे आहे. राजस्थानातील शहर जोधपूर येथे एक घर असे आहे, की ज्यात गाईसाठी बेडरुम आहे. पलंगही आहे. बैल पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे घरभर फिरतो आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र टॉयलेटही आहे. हे गाय-बैल जणूकाही घरातले सदस्यच आहे, अशी त्यांची बडदास्त या घरात ठेवली जाते.
या घराच्या मालकाचे नाव आहे पेमसिंह कछवाह. त्यांची पत्नी संजू कंवर. या दांपत्याने अशा प्रकारे आपले गो-प्रेम सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांचे घर पंचक्रोशीत ‘गायघर’ म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या गाईसाठी केवळ बेडरुम आणि पलंगाची सोय करुन हे दांपत्य थांबलेले नाही, तर तिला थंडी वाजू नये म्हणून मऊसूत मखमली कांबळेही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गाईला आता एक वासरुही झाले आहे. त्याचे नाव त्यांनी लाडाने ‘पृथू’ असे ठेवले आहे.
या गाईला आणि वासराला रोज आंघोळ घातली जाते. त्यानंतर ते बेडरुममध्ये 2 तास विश्रांती घेतात. त्यांना मालकीण स्वतःच्या हाताने चारा भरवते. स्नानानंतर चाऱयाचा नाश्ता झाला की ही गाय पलंगावर चढते आणि सुखाने झोपते. तिचे वासरुही तिच्याबरोबर असते. गाय, बैल आणि त्यांचे वासरु हे कुटुंबाप्रमाणे या घरात राहतात. त्यांना ज्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत, त्यांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आल्याने ते त्यांचा उपभोग आनंदाने घेतात. सोशल मिडियावर हे घर, त्याचे मालक आणि त्यांचे हे गोप्रेम अतिशय लोकप्रिय झाले असून या दृष्याला लाखो ‘लाईक्स’ मिळावेत यात काही आश्चर्य नाही. गाय दूध देते त्यामुळे तिला लोक पाळतात. पण बैलाला मोकळे सोडतात. तथापि, हे कुटुंब या प्रथेला अपवाद आहे. येथे बैलाची काळजीही विशेषत्वाने घेतली जाते. बैल पळवून कत्तलखान्यात नेला जाऊ नये म्हणून त्याला घरातच सांभाळले आहे, असे मालक सांगतात. एकंदर, या बैल कुटुंबाची चैन आहे.