सांगे व कुडचडे मतदारसंघांना जोडणारा बेण्डवाडा-सांगे येथे नदीवर असलेला पोर्तुगीजकालीन पूल कमकुवत बनल्याने गोवा साधनसुविधा विकास महामंडळामार्फत नवीन पूल उभारण्याच्या कामास प्रारंभ झालेला आहे. त्यावर 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 2021 पर्यंत सांगेवासियांना नवीन पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. नवीन पूल जुन्या पुलाला समांतर बांधण्यात येत आहे.
सध्याच्या पुलावरून एकाचवेळी दोन मोठी वाहने सुटत नाहीत. पुलाच्या एका बाजूने जलवाहिनी नेलेली आहे. सुमारे 60 हून जास्त वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला असावा असा अंदाज आहे. नवीन पुलाची कोनशिला तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते 8 जानेवारी, 2019 रोजी बसविण्यात आली होती. त्यानंतर ठेकेदाराकडून माती परीक्षण करण्यात वेळ गेला. अखेरीस डिसेंबरमध्ये जमीन सपाट करणे व इतर किरकोळ कामे चालू झाली. आता पुलाचे खांबे उभारण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम चालू होणार आहे.
या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात यावा म्हणून माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्यापासून माजी आमदार सुभाष फळदेसाई ते विद्यमान आमदार प्रसाद गावकर यांच्यापर्यंत सर्वांनी खूप प्रयत्न केले. सरकारने यापूर्वी अर्थसंकल्पात घोषणा करूनही काही वर्षे पुलाच्या कामाला गती मिळाली नव्हती. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीही पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. पण पूल उभारणीत नंतर काही अडथळे निर्माण झाले होते. त्यात काही घरे हलविणे तसेच संपादित केल्या जाणाऱया जमिनींसंदर्भात जमीनमालकांना देण्यात येणारा दर व एका मंदिराचा समावेश असल्याने हा विषय न्यायालयापर्यंत पोहोचला होता. मात्र सरकारने वरील समस्यांवर तोडगा काढून पुलाच्या कामाला आता खऱया अर्थाने सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
खाण व्यवसाय बंद झाल्याने घटला ताण
सध्याचा पूल अरूंद असून वाहतुकीच्या दृष्टीने तो धोक्याचा ठरू शकतो, अशा तक्रारी होत्या. खाण व्यवसाय चालू असताना या पुलावरून किती वजन वाहून न्यायचे त्याची मर्यादा घालून दिली होती. पण त्यापलीकडे जाऊन वाहतूक होत होती. ट्रकांच्या रांगा पुलावर लागत असत. या पुलाची मध्यंतरी बांधकाम खात्यामार्फत डागडुजी करण्यात आली होती. नदीच्या पात्रात केवळ एका खांबावर उभा असलेला सदर पूल कोसळण्याची भीतीही सांगेवासियांच्या मनात कायम घर करून होती. 2012 पासून खाण व्यवसाय बंद पडल्याने या पुलावरील ताण बराच कमी झाला आहे. मात्र पर्यायी पूल उभारण्याची मागणी कायम होती.
कोनशिला बसविल्यानंतर तब्बल साडेदहा महिन्यांनी पुलाच्या प्राथमिक कामाला प्रारंभ झाला आहे. पोर्तुगीज काळात येथे आधी अरूंद लोखंडी पूल होता. नंतर रीतसर पूल बांधण्यात आला. हा पूल उडवून देण्याचा प्रयत्न झाला होता, पण येथील आराध्य दैवत श्री पाईकदेवाच्या कृपेने तो प्रसंग टळला, असे जाणकार सांगतात.