वार्ताहर / दाभाळ
पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पडझडीत पाईकवाडा बेतोडा येथील उतरणीवर झाड पडून अर्ध्यावर वाकलेला वीज खांब अद्याप त्याच स्थितीत आहे. या वीज खांबामुळे खाली वाकलेल्या वीज वाहिन्या धोकादायक स्थितीत असून तो त्वरित बदलून त्याजागी नवीन वीज खांब उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
निरंकाल फोंडा या मुख्य रस्त्याच्या बाजूने असलेला हा खांब अर्ध्यावर वाकल्याने येथील पथदीप नादुरुस्त झाले आहेत. दाट जंगलातून हा रस्ता जात असल्याने रात्रीच्यावेळी दाट अंधारातून लोकांना प्रवास करावा लागतो. बऱयाचवेळा येथून गवे रेडे रस्ता ओलांडत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथील वाकलेला वीज खांब व पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. अर्धवट वाकलेला हा वीज खांब धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी वाहनावर कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निरंकाल बेतोडा भागात नव्याने वीज वाहिन्या घालताना कंत्राटदाराने व्यवस्थित नियोजन न केल्याने अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचा झाडांना स्पर्श होत आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी वीज खात्य़ाने लक्ष घालण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. पंचायत क्षेत्रातील &अंतर्गत रस्त्यावरील पथदीप बऱयाच ठिकाणी नादुरुस्त झाल्याने चतुर्थीपूर्वी ते दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात येत आहे.