1984 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, विघ्नहर्ता संघ विजेता 37
बेळगाव
दहावीची बॅच प्रत्येकाच्या शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा. अर्थात, हा टप्पा सरल्यानंतर त्यातील सहकारी विद्यार्थी वेगवेगळय़ा वळणावर विखुरले जातात आणि राहतात त्या पाऊलखुणा. याच पाऊलखुणांना नव्याने साद घालण्यासाठी, शक्य तितक्या वर्गमित्रांना एकत्रित आणण्यासाठी बेनकनहळ्ळीत अभिनव क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले गेले आणि यात चक्क 1984 पासूनचे विविध 24 बॅचेस अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले! एकीकडे, या वर्गमित्रांनी क्रिकेट स्पर्धेत नशीब आजमावले व दुसरीकडे या सर्व बॅचेसचा एकत्रित गेटटुगेदरही अगदी थाटात साजरा झाला.
दहावीच्या 2005-06 बॅचतर्फे या गावातील 1984 पासूनच्या दहावीच्या बॅचसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 7001 व ट्रॉफी तर दुसरे 4001 रुपये व ट्रॉफी अशी बक्षिसे होती.
स्पर्धेत दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकूण 24 बॅचच्या संघांनी सहभाग घेतला. 27 डिसेंबरपासून ही स्पर्धा घेण्यात आली. दर रविवारी सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेचे जेतेपद विघ्नहर्ता 2008-09 बॅच व दुसरे बक्षीस वर्गमित्र 2005-06 बॅच या संघाने पटकाविले.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 7001 रुपयाचे बक्षीस माजी एपीएमसी सदस्य बाळू हणमंत देसूरकर व डॉ. राजू पाटील, बेनकनहळ्ळी यांनी चषक दिला. दुसरे बक्षीस वर्गमित्र 2005-06 यांच्याकडून तर चषक परशराम पंडित पिसाळे यांनी दिला. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षणासाठी प्रमोद देसूरकर यांनी चषक दिले. सर्वोत्कृष्ट संघासाठी विक्रम देसूरकर यांनी चषक पुरस्कृत केला होता. बक्षीस वितरणावेळी बाळू हणमंत देसूरकर, परशराम पी. पिसाळे, वसंत मोनाप्पा पाटील, सुभाष खांडेकर, विक्रम देसूरकर, प्रमोद देसूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण पाटील यांनी केले. राहुल ए. देसूरकर यांनी आभार मानले.