बेळगाव/ प्रतिनिधी
मल्लखांब हा एक कसरीतींचा प्रकार आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मलखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार आहे. कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडाप्रकार असे मलखांब खेळाचे वर्णन आहे. बेनकनहळ्ळी येथील सुरज भरमा देसूरकर हे गेल्या सहा वर्षांपासून बेनकनहळ्ळी गावातील मुलांना मोफत मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत.
त्यांच्या या प्रशिक्षण शिबिरात मुले व मुली असे दोघे मिळून 45च्या वर प्रशिक्षणार्थीं आहेत. मुलांसाठी मलखांब व मुलींसाठी रोपमल्लखांबाचे धडे देत आहेत तेही कोणत्याही मोबदल्याविना.
बेनकनहळ्ळी येथील राजे शंभू स्पोर्ट्स क्लब येथे सर्व गावातील मुलांना प्रशिक्षण देत असून मलखांब या क्रीडा प्रकारात बेनकनहळ्ळी गावाचे नाव उच्च पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच फक्त गाव पातळीवर प्रशिक्षण न राबवता शहरातील मुलांनाही त्यांना शिकविण्याची इच्छा आहे.
सध्या या तंत्रज्ञानाचा आधुनिक युगात सर्व मुले मोबाईल व इंटरनेटच्या जाळय़ात अडकली आहेत. यामुळे एकाच जागी बसून राहिल्यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढलेला पाहायला मिळत आहे. मल्लखांब हा असा क्रीडा प्रकार आहे की ज्यात कमी वेळात जास्तीत जास्त शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. त्यामुळे मुलांमधील स्थूलपणा कमी होण्यास मदत होते. मोफत मलखांबचे प्रशिक्षण दिल्यास गावातील जास्त मुले, मुली याचे प्रशिक्षण घेतील. या हेतूने सुरज देसूरकर यांनी हे शिबिर राबविले आहे. तसेच ज्या मुलांना या क्रीडा प्रकारात आवड आहे त्यांनी या 9480142090 या क्रमांकाशी संपर्क साधावे आवाहन त्यानी केले आहे.