वार्ताहर / मालवण:
कुंभारमाठ येथून बेपत्ता झालेला भिमा गंगाराम मानवर याला मालवण पोलिसांच्या टिमने शोधून काढले. सोमवारी रात्री ओसरगाव येथील पिकअप शेडमध्ये भिमा सापडला. बोलता व ऐकता न येणारा भिमा कोठे गेला असेल, या काळजीने व्याकुळ झालेली भिमाची आई त्याची वाट पाहत होती. अखेर मालवण पोलिसांच्या टिमने भिमाची आईशी भेट घडवून आणली. भिमा कुंभारमाठ येथून ओसरगावला गेलाच कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे त्याचे कोणी तरी अपहरण केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभारमाठ येथे मोलमजुरी करून राहणाऱया मानवर कुटुंबातील भिमा बेपत्ता झाला होता. भिमाला बोलता व ऐकता येत नसल्याने तो कुठे गेला असेल, या चिंतेत त्याचे आई व लहान भाऊ होते. मालवण पोलीस ठाण्यात भिमा बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, सुभाष शिवगण, मंगेश मागे, संतोष पुटवाड यांनी मालवण तालुक्यात शोधमोहिम राबविली.
अखेर भिमा सापडला
मालवण पोलिसांनी तालुक्यातील पोलीस पाटलांना बेपत्ता भिमाबाबत माहिती दिली होती. त्यामुळे भिमाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. सोमवारी रात्री ओसरगाव येथील ग्रामस्थाला एक लहान मुलगा शांतपणे पिकअप शेडमध्ये बसलेला दिसला. त्या ग्रामस्थाने याची माहिती ओसरगाव पोलीस पाटील व मालवण पोलिसांना दिली. मालवण पोलिसांनी ग्रामस्थाकडून पिकअप शेडमधील लहान मुलाचा फोटो मागवून घेतला. फोटोतील व्यक्ती भिमाच असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी ओसरगाव येथील पिकअप शेड गाठून भिमाला ताब्यात घेतले. त्यानंतर भिमाला त्याच्या आईकडे सोपविण्यात आले. अल्पवयीन भिमा बेपत्ता झाल्याची तक्रार मालवण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार मालवण पोलीस तपास करत होते.