मुचंडी येथील घटना, गावात हळहळ
प्रतिनिधी /बेळगाव
गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या सिद्धेश्वर गल्ली-मुचंडी येथील एका शाळकरी मुलाचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला आहे. स्थानिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला आहे. शाळकरी मुलाच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गौतम श्रीकांत कोणो (वय 10) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 3 पासून गौतम बेपत्ता होता. कुटुंबीयांनी सर्वत्र त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. सोशल मीडियावर या संबंधीची माहिती व्हायरल करून बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र घरापासून जवळच असलेल्या विहिरीत तो पडल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला.
त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. उपलब्ध माहितीनुसार याच विहिरीत गौतम यापूर्वीही पडला होता. मात्र त्यावेळी त्याला वाचविण्यात यश आले होते. गुरुवारी खेळताखेळता विहिरीत पडलेल्या गौतमचा अखेर मृतदेह आढळून आला आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.