शवचिकित्सा अहवालातून झाले स्पष्ट
प्रतिनिधी / म्हापसा
नास्नोळा बार्देश येथील सिद्धी संदीप नाईक (वय 25) हिचा मृतदेह कळंगूट समुद्रात मृतावस्थेत सापडला असून तिच्या वडिलांनी ती आपलीच मुलगी असल्याचे सांगितल्यावर कळंगूट पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सासाठी बांबोळी येथे पाठवून दिला. शवचिकित्सा अहवालात सिद्धी हिचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना म्हणाले की, दोन दिवसांपासून सिद्धी नाईक बेपत्ता होती. तिचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. शिवाय कुटुंबियांनी तिची माहिती देणाऱयास बक्षिसही जाहीर केले होते. मयत व्यक्ती सिद्धी एका मॉलमध्ये कामाला होती. ती ग्रीन पार्ककडून बेपत्ता झाली होती अशी माहिती हाती आली आहे.
काल गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह समुद्रकिनारी तरंगताना आढळला. तिच्या वडिलांनी म्हापसा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. घटनेची माहिती कळंगूट पोलिसांना दिल्यावर कळंगूट पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व तिच्या वडिलांना बोलावून घेतले असता ती सिद्धीच असल्याचे स्पष्ट झाले.