वृत्तसंस्था / मिंस्क :
बेलारुसमध्या अध्यक्षीय निवडणुकीपासून राजकीय संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता सैनिकांना शहरांच्या रस्त्यांवर उतरावे लागले आहे. विरोधी पक्षांनी अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांचा विजय मान्य करण्यास नकार दिला आहे. लुकाशेंको हे अडीच दशकांपासून सत्तेवर आहेत. अनेक आठवडय़ांपासून त्यांच्या विरोधात उग्र निदर्शने होत आहेत.
स्थिती पाहता लुकाशेंको यांनी सैनिकांना देशाच्या सीमेवर तैनात करणार असल्याचे म्हटले होते. तसेच पाश्चिमात्य देश आणि सर्वप्रथम लिथुआनिया आणि पोलंडसोबतची सीमा बंद करण्याचा हुकुम दिला होता. मित्रदेश युक्रेनसोबत लागून असलेल्या सीमेवरही सैन्य तैनात करावे लागल्याने खंत वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सीमेवरील स्थितीत कुठलाच बदल घडलेला नाही. लुकाशेंको यांचे विधान दुष्प्रचाराचा एक प्रयत्न असल्याचे आम्ही मानतो असे उद्गार पोलंडचे विदेश उपमंत्री पावेल जाबलोंस्की यांनी काढले
आहेत.
लुकाशेंकोवर पद सोडण्याचा दबाव
विरोधी पक्ष सातत्याने लुकाशेंको यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव ठेवून आहेत. निवडणुकीत लुकाशेंको यांना आव्हान देणाऱया विरोधी पक्षाच्या नेत्या स्वेतलाना तिखानोवस्काया यांनी आम्ही हटणार नाही, आता एक नवा बेलारुस पहायचा असल्याचे म्हटले आहे. लुकाशेंको यांना पद सोडावेच लागेल असे त्यांनी सांगितले आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल बेलारुसचे अधिकारी सरकारविरोधी नेत्यांवर कारवाई करत आहेत.