ब्रिटिश सैन्यप्रमुखांनी रशियाला ठरविले जबाबदार
वृत्तसंस्था / वॉर्सा
बेलारुस आणि पोलंड यांच्यात स्थलांतरितांवरून निर्माण झालेल्या सीमा वादामुळे युरोपमध्ये प्रचंड अस्वस्थ स्थिती आहे. सुमारे 6 देशांचे सैन्य परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहे. रशिया आणि बेलारुसच्या सैन्याच्या आघाडी विरोधात पोलंडच्या समर्थनार्थ ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनी एकवटले आहेत. याचदरम्यान ब्रिटनचे संरक्षणप्रमुख जनरल निक कार्टर यांनी ख्ाळबळजनक खुलासा केला आहे.
बेलारुस आणि पोलंडमधील स्थलांतरित संकटात रशियाच्या हस्तक्षेपामुळे युरोप युद्धाच्या उंबरठय़ावर आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीच्या सुमारे 30 वर्षांनी पहिल्यांदाच रशियाच्या सैन्य महत्त्वाकांक्षा पूर्ण खंडासाठी मोठा धोका ठरल्या आहेत. शीतयुद्धादरम्यान सक्रीय राहिलेले डिप्लोमॅटिक चॅनल देखली आता अस्तित्वात नसल्याचे कार्टर यांनी म्हटले आहे.
स्थलांतरित समस्येशी रशियाचे कुठलेच देणेघेणे नाही. युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी बेलारुसचे अध्यक्ष लुकाशेंको यांच्याशी चर्चा करावी असे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी संध्याकाळी म्हटले आहे. स्थलांतरितांचा वापर बेलारुस ढाल म्हणून करत असल्याचा आरोप पोलंडचे संरक्षणमंत्री ब्लासजॅक यांनी केला आहे. तर बेलारुसचे अध्यक्ष लुकाशेंको यांनी आमचा देश स्वतःच्या सीमांचे रक्षण करण्यापासून मागे हटणार नसल्याचे उद्गार काढले आहेत.
स्थलांतरितांना मनस्ताप
सूत्रांनुसार पोलंड आणि बेलारुसच्या सीमेवर सुमारे 2 हजारांहून अधिक स्थलांतरित आहेत. अफगाणिस्तानच्या हाजरा समुदायाच्या असगारी यांनी सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आम्हाला फुटबॉलसमान मारत आहेत, ही सीमा नरकासमान असून उणे तापमानात आम्ही मुलांसोबत वास्तव्य करत असल्याचे सांगितले आहे.
आण्विक क्षेपणास्त्र यंत्रणेची मागणी
बेलारुसचे अध्यक्ष लुकाशेंको यांनी शनिवारी उशिरा संध्याकाळी स्वतःच्या योजना पुन्हा उघड केल्या आहेत. आम्ही रशियाकडून इस्कँडर मोबाइल आण्विक क्षेपणास्त्र यंत्रणा मागितली आहे. या क्षेपणास्त्रांचा मारक पल्ला सुमारे 500 किलोमीटर आहे. या यंत्रणांना पश्चिम तसेच दक्षिण सीमेवर तैनात करू इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे. तर रशियाने लुकाशेंको यांच्या या मागणीवर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
लेझर लाइट्सचा वापर
बेलारुसची सैन्य तुकडी सीमेवर पोलंडच्या सैनिकांच्या डोळय़ांना ईजा व्हावी म्हणून लेझरने लाइट्सचा मारा करत आहे. हा प्रकार दर्शविणाऱया अनेक चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत. याचबरोबर बेलारुसने स्वतःच्या सीमेत असलेल्या स्थलांतरितांना अश्रूधूराच्या कांडय़ा पुरविल्या आहेत. त्यांचा वापर पोलंडच्या सैनिकांवर करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
रशियाच्या विमानांना पिटाळले
रशियाच्या लढाऊ विमानांनी युक्रेनवर हल्ल्याच्या उद्देशाने शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर सागराच्या दिशेने उड्डाण केले होते. पण ब्रिटिश वायुदलाच्या लढाऊ विमांनी रशियाच्या विमानांना नेदरलँड्सच्या वायुसीमेवरच रोखले. रशियन विमानांना युक्रेनच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाची दिशा बदलावी लागली आहे.