वृत्तसंस्था/ मिनसेक
कोरोना व्हायरस महामारीचे संकट बेलारूसलाही बसले असले तरी बेलारूस शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्याची अनिच्छा दाखविली आहे. त्यामुळे तेथील फुटबॉल लीगने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील ही एकमेव फुटबॉल लीग सध्या सुरू आहे.
युरोपियन देशांना कोरोनाचा फटका मोठय़ा प्रमाणात बसला आहे. युरोपियन फुटबॉल स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या असून बेलारूसचा याला अपवाद म्हणावा लागेल. त्यांच्या सरकारनेच लॉकडाऊन लागू करण्यास अनिच्छा दाखविली असल्याने फुटबॉल लीग सामने खेळविले जात आहेत. पण कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती असल्याने शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्याला केवळ 300 शौकिनांनी प्रत्यक्ष सामन्याला उपस्थित राहण्याचे धाडस दाखविले. फुटबॉलपटू तसेच फुटबॉल शौकिनांना मास्क वापराची सक्ती शासनातर्फे करण्यात आली आहे पण फुटबॉलपटूंना आपण धोका पत्करत असल्याची काळजी वाटत आहे. बेलारूसमध्ये लॉकडाऊन नसल्याने जनजीवन सुरळीत सुरू असल्याचे दिसून येते. सार्वजनिक वाहतूक आणि दुकानांच्या विक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून येते. विश्व आरोग्य संघटनेने बेलारूस लॉकडाऊनची शिफारस केली आहे पण सरकारने त्याबाबत फारसे स्वायस्य दाखविले नाही. बेलारूस देशाची लोकसंख्या जवळपास एक कोटी असून आतापर्यंत 9550 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचप्रमाणे बेलारूसच्या शेजारी असलेल्या युक्रेनमध्ये कोरोनाची बाधा झालेले रूग्ण अत्यंत कमी आहेत.
बेलारूस शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सध्याच्या स्थितीत कोणत्याही परिस्थितीत फुटबॉलचे सामने थांबविले जाणार नाहीत, असे बेलारूसच्या फुटबॉल फेडरेशनतर्फे सांगण्यात आले आहे. 30 एप्रिल रोजी बेलारूसमध्ये महिलांच्या लीग फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे. ही स्पर्धा यापूर्वी दोन आठवडय़ासाठी लांबणीवर टाकण्यात आली होती.