वृत्तसंस्था/ पॅरीस
बेल्जियमचा पुरूष टेनिसपटू डेव्हिड गोफिनने रविवारी येथे माँटेपिलेर खुल्या सूद डी फ्रान्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना स्पेनच्या ऍग्युटचा पराभव केला.
या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात गोफिनने ऍग्युटचा 5-7, 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. तब्बल तीन वर्षांनंतर गोफिनचे एटीपी टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. यापूर्वी 30 वर्षीय गोफिनने 2017 साली टोकियोत झालेल्या एटीपी स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. रविवारच्या अंतिम सामन्यात गोफिनने 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. 2012 साली बर्डीचने तर 2017 साली जर्मनीच्या व्हेरेव्हने ही स्पर्धा जिंकली होती. आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेत फ्रान्सच्या टेनिसपटूंनी आपले वर्चस्व राखले होते.