वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या वर्गवारी गटातील सामन्यात बेल्जियमने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. आता या स्पर्धेत बेल्जियमचा पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठीचा प्लेऑफ सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.
शुक्रवारच्या सामन्यात स्पेनने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आपले खाते उघडले. स्पेनचा हा पहिला गोल क्मयुनिलने केला. 24 व्या मिनिटाला क्मयुनिलने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत स्पेनने बेल्जियमवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बेल्जियमच्या खेळाडूने आक्रमक खेळावर अधिक भर देत स्पेनच्या बचावफळीवर दडपण आणले. 33 व्या मिनिटाला जेरेमी विल्बर्सने बेल्जियमचे खाते उघडले. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना स्टॉकब्रोक्सने बेल्जियमचा दुसरा गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. पंचांनी त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला आणि या प्रक्रियेत बेल्जियमतर्फे डय़ुव्हेकॉट, स्टॉकब्रोक्स, बिकेन्स आणि विल्बर्स यांनी गोल नोंदविले. स्पेनतर्फे मॅन्युएल रॉड्रीग्ज आणि लेसिला यांना गोल नोंदविता आले नाहीत. अखेर बेल्जियमने स्पेनचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले.
वर्गवारीसाठी झालेल्या दुसऱया एका सामन्यात नेदरलँड्सने मलेशियाचा 9-3 असा पराभव केला. नेदरलँड्सतर्फे मिलेस बुकेन्सने 3 गोल तर ल्युक डॉमेरशुझेन याने 3 गोल नोंदविले. डेव्हिड हुसेनने 2 तर मॅक्स डी. बी. याने 1 गोल नोंदविला. आता सातव्या आणि आठव्या स्थानासाठी स्पेन आणि मलेशिया यांच्यात रविवारी सामना होणार आहे. तसेच बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्यात पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी सामना होईल.