स्पा-प्रँकरचॅम्प्स, बेल्जियम
: मर्सिडिजच्या लुईस हॅमिल्टनने फॉर्म्युला वन चॅम्पियनशिप रेसमधील आघाडी आणखी भक्कम करताना बेल्जियम ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद पटकावले. त्याचाच संघसहकारी बोटासने दुसरे तर रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने तिसरे स्थान मिळविले. मॅक्स सलग सहा शर्यतीत पोडियमवर येण्यात यशस्वी ठरला.
हॅमिल्टनने पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि त्याचा सहकारी मॅक्सपेक्षा 8.4 सेकंद कमी वेळ घेत पहिले स्थान मिळविले. त्याचे हे 89 वे जेतेपद असून मायकेल शुमाकरचा विक्रम गाठण्यासाठी त्याला आणखी दोन जेतेपदांची गरज आहे. तो आता मॅक्सपेक्षा तब्बल 47 गुणांनी पुढे असून बोटासने मॅक्सविरुद्धचे अंतर कमी केले असले तरी त्याला तिसऱया स्थानावरच रहावे लागले आहे. डॅनियल रिकार्डोने चौथे, त्याचा सहकारी एस्टेबन ओकॉनने पाचवे, रेड बुलच्या अलेक्झांडर अल्बॉनने सहावे, मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने सातवे स्थान प्राप्त केले.
टोरो रोसोच्या पीयर गॅसलीने आठवे, रेसिंग पॉईंटच्या लान्स स्ट्रोलने नववे आणि त्याचाच सहकारी सर्जिओ पेरेझने दहावे स्थान मिळविले. गेली दोन वर्षे येथे जेतेपद मिळविलेल्या फेरारीला मात्र या शर्यतीत एकही गुण मिळविता आला नाही तर सेबॅस्टियन व्हेटेलला तब्बल 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.