तीन वर्षांचा यशस्वी प्रवास, प्रवाशांमधून आनंद
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील रेल्वे प्रवाशांची ‘हक्काची एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱया बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेसला मंगळवारी तीन वर्षे पूर्ण झाली. या एक्स्प्रेसमुळे बेळगावमधील प्रवाशांचा प्रवास सुखाचा झाला आहे. तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेल्वे प्रवाशांकडून केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
बेळगावहून बेंगळूरला जाण्यासाठी पूर्वी चन्नम्मा एक्स्प्रेस हा एकमेव पर्याय होता. यामुळे बुकिंग मिळत नसल्याची तक्रार वारंवार होत होती. त्यामुळे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-बेंगळूर या मार्गावर एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली. रात्री उशिरा बेळगावमधून निघून सकाळी बेंगळूर येथे पोहोचत असल्यामुळे या रेल्वेला काही दिवसांतच उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या दिवसात नैर्त्रुत्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली एक्स्प्रेस त्यानंतरच्या काळात कायम करण्यात आली.
बेळगावकरांना या एक्स्प्रेसमुळे बेंगळूरचा प्रवास अतिशय सुखकर झाला आहे. रात्री 9 वा. बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस सकाळी 7.30 वा. बेंगळूरमध्ये पोहोचत असल्यामुळे प्रवास अतिशय आरामदायी होत आहे. मंगळवारी या एक्स्प्रेसने तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. रेल्वे इंजिनला ऊस बांधून हार घालून केक कापून आनंद साजरा करण्यात आला.